मुंबई प्रतिनिधी
मुंबई : हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमधून सात पिंजऱ्यांमध्ये कोंबून दोन हजारांहून अधिक पक्ष्यांची वाहतूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ३०० हून अधिक पक्षी जप्त करण्यात आले असून, त्यापैकी २०० हून अधिक पक्ष्यांचा अंतरिम ताबा रायगडमधील कालोटे ॲनिमल ट्रस्टकडे देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित दीड हजारांहून अधिक पक्ष्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

पक्ष्यांची विक्री झाल्याचे संबंधित दुकानमालकांनी पोलिसांना सांगितल्याचा दावा पेटा इंडियाने केला आहे. सीएसएमटी येथील ३५ व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त पक्ष्यांचा अंतरिम ताबा कालोटे ॲनिमल ट्रस्टकडे सोपवण्यात आला.
पेटा इंडियाने या प्रकरणी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र शिवरामवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याचे पेटाने म्हटले आहे.

८ सप्टेंबर रोजी पहाटे २.१५ वाजता गीतांजली एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकात दाखल झाल्यानंतर पेटाच्या पथकासह जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पार्सल डब्यातील पक्ष्यांची पाहणी केली. त्यानंतर पक्ष्यांना ताब्यात घेण्यात आले. उपचारादरम्यान काही पक्ष्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
पक्ष्यांना ठेवलेल्या ठिकाणी पुरेशी जागा, हवा, पाणी आणि खाद्य उपलब्ध नसल्याने त्यांची प्रकृती बिघडून काहींचा मृत्यू झाल्याचे पेटा इंडियाने म्हटले आहे.

उर्वरित पक्ष्यांचा शोध घेण्याची मागणी
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पेटा इंडियाने सांगितले. काही पक्षी यापूर्वीच विकले असल्याची माहिती दुकानमालकांनी पोलिसांना दिल्याचा दावा संस्थेने केला आहे.
उर्वरित पक्ष्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना परत मिळवण्यासाठी कारवाई करावी, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यावरही कारवाई करावी, अशी मागणी पेटा इंडियाने केली आहे.


