मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेची सफर लवकरच महागण्याची शक्यता आहे. महापालिकेने राणीबागेतील प्रवेश शुल्कात थेट दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लहान मुलांसाठीचे तिकीट २५ रुपयांवरून ५० रुपये, तर प्रौढांसाठीचे तिकीट ५० रुपयांवरून १०० रुपये होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महसूलवाढीसाठी विविध पर्यायांचा आढावा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांकडून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तपासले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन दर लागू होतील.
पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या वाढली
भायखळ्यातील राणीबाग सुमारे ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. येथे बिबट्या, कोल्हा, तरस, अस्वल यांसह विविध प्राणी आणि पक्षी आहेत. २०१७ मध्ये पेंग्विन कक्ष सुरू झाल्यानंतर राणीबागेच्या आकर्षणात मोठी भर पडली. त्यामुळे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असून, सुट्टीचे दिवस, शाळांच्या सहली आणि पर्यटन हंगामात राणीबागेत मोठी गर्दी पाहायला मिळते.
वर्षभरात २५ लाखांहून अधिक पर्यटक
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २५ लाख ४२ हजार १३५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. या माध्यमातून महापालिकेला ९ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल मिळाला.
एप्रिल २०२६ मध्ये १ लाख ९१ हजार ६१५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून ७५ लाख ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढून ३ लाख १० हजार ६५४ झाली आणि महापालिकेला १ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांचा महसूल मिळाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पर्यटकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेसमोर महसूलवाढीचे आव्हान
मुंबईत सध्या दोन लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीची विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचवेळी महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट होत असून, महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर महापालिकेचा भर आहे.
याच पार्श्वभूमीवर राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, दरवाढीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या राणीबागेला भेट देणाऱ्या पर्यटकांना जुनेच दर लागू आहेत.


