ठाणे प्रतिनिधी
ठाणे : भिवंडी तालुक्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेला त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज भिवंडी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. आरोपींच्या वतीने तसेच सरकारी पक्षाकडून करण्यात आलेले युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर या प्रकरणातील पुढील तपास आणि पोलिसांची कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. पवार यांना अटक होणार का, याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मदत करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीला कल्याण शहरातील कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेण्यात आल्याचा आरोप आहे. तेथे शस्त्राचा धाक दाखवून, दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल होताच सर्व पदांचा राजीनामा
गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेंद्र पवार यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्रही पाठवले आहे.
दरम्यान, भिवंडी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. “सत्याचा विजय झाला आहे आणि लोकशाही आजही जिवंत आहे. याचे उदाहरण म्हणजे माजी आमदारांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला,” असे त्यांनी म्हटले.
आता न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांकडून नरेंद्र पवार यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जाते, तसेच या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


