मुंबई प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसकडून सातत्याने संविधान आणि घटनात्मक संस्थांविरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. “कितीही प्रयत्न केला तरी भारतात साम्यवादी राजवट आम्ही आणू देणार नाही,” असा थेट इशारा देत फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसची जनतेचा घटनात्मक संस्थांवरील विश्वास कमी करण्याची रणनीती यशस्वी होणार नाही. संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्था अबाधित राहतील, असा दावा त्यांनी केला.
शनिवारी तिन्ही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि विरोधकांकडून मांडण्यात येत असलेले कथित “फेक नॅरेटिव्ह” उद्ध्वस्त झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन घटनात्मक संस्थांवर आरोप करत आहेत. या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
‘राहुल गांधींची मानसिकता डाव्या विचारसरणीची’
राहुल गांधी यांची मानसिकता साम्यवादी आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. संविधानावरील जनतेचा विश्वास कमी करून देशातील घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
SIRसह विविध निर्णयांबाबत तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, सर्व निर्णय एकमताने झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे फडणवीस म्हणाले. कॅबिनेट सचिवांना पाठवण्यात आलेले पत्र हे धोरणात्मक निर्णयांवरील मतभेदाशी संबंधित नसतानाही त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
फॉर्म-६च्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘जिंकल्यावर आयोग चांगला, हरल्यावर आरोप’
निवडणुकीतील पराभवानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याची प्रवृत्ती असल्याचा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेस विजयी झाली तेव्हा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत; मात्र भाजप विजयी झाल्यानंतर त्याच आयोगाच्या कामकाजावर संशय घेतला जात असल्याचे ते म्हणाले.
जनतेचे प्रश्न घेऊन जनतेत गेले तर जनता साथ देईल. मात्र जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएमवर आरोप करण्यात आले आणि आता ईव्हीएमनंतर निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
‘ज्यांचा मेंदू चोरीला गेला, तो परत मिळतो का ते पाहा!’
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणाऱ्यांवर टीका करताना फडणवीस यांनी उपरोधिक भाषेत जोरदार टोला लगावला. “जे आरोप करत आहेत, त्यांचा मेंदू चोरीला गेला आहे. पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, एक तपास समिती तयार करून ज्यांचे मेंदू चोरीला गेले आहेत ते परत मिळवता येतील का, याची व्यवस्था करावी,” असे ते म्हणाले.
निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि संविधानिक संस्थांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष या वक्तव्यामुळे आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


