अमरावती प्रतिनिधी
अमरावती : भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रिया गणेशराव मावसकर (वय ११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मेळघाटातील राणीगाव येथील रहिवासी होती.
छातीत तीव्र वेदना झाल्याने रुग्णालयात दाखल
प्रिया ही भातकुली येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने तिला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार?
दरम्यान, विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तिचे शवविच्छेदन न करताच घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्यामुळे या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मृत्यूचे नेमके कारण काय, तसेच वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया न राबवता अंत्यसंस्कार का करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आदिवासी संघटनांकडून सखोल चौकशीची मागणी
या घटनेनंतर विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यार्थिनीच्या मृत्यूची तसेच आश्रमशाळा प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीतून समोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


