मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून सवलतीचे तिकीट घेण्यासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांनी त्यापूर्वी कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
एसटी महामंडळाने NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया राज्यातील एसटी आगार तसेच बसस्थानकांवर सुरू केली आहे. कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर प्रवाशाला QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत ही पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येईल. ही पावती ३० दिवसांसाठी वैध राहणार असून, या कालावधीत संबंधित प्रवाशाने NCMC कार्ड सक्रिय करून त्यामध्ये आवश्यक रक्कम भरणे अपेक्षित आहे.
NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी बसस्थानके, आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत केंद्रांवर ही प्रक्रिया उपलब्ध आहे. कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM Appच्या माध्यमातून टॉप-अपची सुविधाही देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड स्कॅन करून ही रक्कम भरता येणार आहे.
वयोमानामुळे आधार कार्डवरील बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे जुळत नसलेल्या पात्र प्रवाशांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्डची नोंदणी पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत बायोमेट्रिक अडचण येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवास योजनेचे व्यवस्थापन अधिक डिजिटल पद्धतीने करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट घेताना NCMC कार्ड किंवा नियमांनुसार ग्राह्य असलेली नोंदणी पावती जवळ ठेवणे संबंधित प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.


