
मुंबई प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ATM च्या वापरासाठी शुल्क वाढवण्याची तयारी करत आहे. एका अहवालानुसार, RBI एटीएममधून पाच मोफत व्यवहारांच्या मर्यादेचा जास्त वापर झाल्यानंतर ATM वापर शुल्क आणि इंटरचेंज शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्त शुल्क आकारले जाऊ शकते, आणि त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अधिक भार पडताना दिसणार आहे. तर हे शुल्क किती आकारले जाईल , याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शिफारस केली आहे की पाच मोफत एटीएम व्यवहारांच्या नंतर कमाल रोख व्यवहार शुल्क 21 रुपये वरून 22 रुपये करण्यात यावे. त्याचप्रमाणे, एटीएम इंटरचेंज फी 17 रुपये वरून 19 रुपये करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. प्रामुख्याने आपण दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास इंटरचेंज शुल्क लागू होणार आहे . यामध्ये बँक एक दुसऱ्या बँकेला दिलेली रक्कम असते, जी एटीएम सेवा वापरण्याचे शुल्क म्हणून ग्राहकावर आकारली जाते. ही रक्कम ग्राहकाच्या बिलावर दिसून येते.
RBI चा निर्णय –
एका अहवालानुसार बँका आणि व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन-मेट्रो क्षेत्रांमध्ये शुल्क वाढवण्याच्या योजनेसह सहमत झाले आहेत. मात्र , RBI ने अजून यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. वाढत्या महागाई, कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ , वाहतूक खर्चामुळे, बिगर मेट्रो शहरांमध्ये एटीएम वापरण्याचे खर्च वाढले आहेत. यामुळे एटीएम ऑपरेटरसाठी खर्च वाढला आहे . या कारणामुळेच एटीएम सेवा शुल्कात वाढ होऊ शकते.