लेह :
लडाखमधील गेल्या वर्षीच्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे आपला ‘एन्काउंटर’ होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. तसेच लडाखमधील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वांगचुक यांनी केली.
२४ सप्टेंबर २०२५ रोजी लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या सभेत वांगचुक यांनी त्यांना जीवाला धोका असल्याबाबत इशारे मिळाल्याचे सांगितले. यापूर्वी आपल्याला तुरुंगात टाकण्यात आले असून आता एन्काउंटर होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
लडाखमधील गेल्या वर्षीच्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्यात आली असून तिचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही वांगचुक यांनी केली. अहवाल जाहीर न झाल्यास स्वतंत्र ‘पीपल्स ट्रिब्युनल’च्या माध्यमातून घटनेची चौकशी करण्याची भूमिका त्यांनी मांडली. सुरक्षा दलांनी स्वयंचलित शस्त्रांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, लडाख पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत ते तथ्यहीन व दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.


