मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे २६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रशासकीय पातळीवरील माहितीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यावर दौऱ्यात भर राहणार असल्याचे शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
२६ सप्टेंबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील खानापूर, लातूरमधील तावशी ताळ, नांदेडमधील गाऊंड आणि हिंगोली जिल्ह्यातील माळवटा शिवार या भागांना भेट दिली जाणार आहे. २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्ण, जालना जिल्ह्यातील वरफळ व रामनगर साखर कारखाना परिसर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भगतवाडी येथे पाहणी प्रस्तावित आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्या मागण्या मांडल्या जातात आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत त्यांची भूमिका काय राहते, याकडे लक्ष लागले आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक
२६ सप्टेंबर : बोरामणी (दक्षिण सोलापूर), खानापूर (धाराशिव), तावशी ताळ (लातूर), गाऊंड (नांदेड), माळवटा शिवार (हिंगोली).
२७ सप्टेंबर : टाकळी कुंभकर्ण (परभणी), वरफळ व रामनगर साखर कारखाना (जालना), भगतवाडी (छत्रपती संभाजीनगर).


