कराड प्रतिनिधी
कराड : इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांमध्ये वाढत असताना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी Academic Heights Public School, Karad येथे विशेष सायबर जागरूकता उपक्रम घेण्यात आला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथील ‘सायबर शक्ती क्लब’च्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि जबाबदार डिजिटल वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘माझी माहिती, माझी जबाबदारी’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून फिशिंग संदेश, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया खाते हॅक होणे, वैयक्तिक माहितीची चोरी, खोट्या बक्षिसांच्या व ऑफर्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसेच सोशल मीडियावरील चुकीची माहिती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची खात्री करणे, वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तींना न देणे आणि संशयास्पद ऑनलाइन संवादापासून सावध राहणे, याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.
सायबर वॉरियर्स अनिकेत ढोत्रे आणि विशाखा गुजर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मजबूत व वेगळे पासवर्ड वापरणे, सोशल मीडिया खात्यांच्या गोपनीयता सेटिंग्जची काळजी घेणे, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना सतर्क राहणे आणि पासवर्ड नियमितपणे बदलण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर आणि सार्वजनिक वाय-फाय वापरताना घ्यावयाची खबरदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांमुळे सत्र अधिक संवादात्मक झाले.
या वेळी Academic Heights Public School चे संचालक संजय जाधव आणि प्राचार्य सजाद मीर उपस्थित होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापराच्या सवयी रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांचा अधिक सजग आणि जबाबदारपणे वापर करण्याची दिशा मिळाली.
या उपक्रमाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. संजीव वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. ‘सायबर शक्ती क्लब’च्या शिक्षक समन्वयक प्रा. डॉ. प्रियांका शिंदे यांनी उपक्रमाचे समन्वयन केले.


