मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाअभावी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे मदतीसाठी केवळ प्रशासकीय निकष, पंचनामे किंवा अन्य प्रक्रियांमध्ये वेळ न दवडता सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भूमिका मांडण्यात उद्धव ठाकरे यांनी आली आहे.
दुष्काळामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आणि मका यांसारख्या पिकांवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची चिंता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेतही अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जीवन कवडे या शेतकऱ्याने चार क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले. मात्र त्याला ४०० किलो मिरचीपोटी केवळ १ हजार १७ रुपये मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या मिरचीच्या तोडणीचा मजुरी खर्चच २ हजार रुपये झाला असून त्यात बियाणे, खत आणि वाहतूक खर्चाचा समावेश नाही. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाबरोबरच बाजारातील परिस्थितीमुळेही शेतकरी अडचणीत असल्याचे या उदाहरणातून मांडण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी न करता बाजार समित्यांमधील व्यवहारांचीही पाहणी करावी आणि शेतमालाला योग्य मोबदला मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.


