मुंबई प्रतिनिधी
मुंबई : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनपेक्षितरीत्या वाढलेल्या वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांच्या शंका दूर करणे, बिलिंगमधील अडचणी तपासणे आणि स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत पडताळणी करण्यासाठी संबंधित ग्राहक सेवा कार्यालयांमध्ये ‘स्मार्ट मीटर आणि बिलिंग हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आले आहेत.
या मोहिमेअंतर्गत बेस्टचे अधिकारी ग्राहकांच्या तक्रारींची जागेवर जाऊन तपासणी करणार आहेत. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत शंका असल्यास ग्राहकांच्या समक्ष मीटरची तपासणी केली जाणार आहे. तसेच तक्रारींचे निराकरण आणि मीटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र ‘तपासणी मीटर’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरच्या वापराबाबतही ग्राहकांना माहिती दिली जाणार आहे.
ग्राहकांना miBEST मोबाइल अॅप वापरण्याबाबत मार्गदर्शन तसेच स्मार्ट मीटरमधील ToD (Time of Day) सुविधेच्या फायद्यांची माहिती दिली जाणार आहे. तक्रारीचे समाधानकारक निराकरण झाल्यानंतर ग्राहकांकडून औपचारिक अभिप्रायही घेतला जाणार आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर असामान्यरीत्या वाढीव बिलाचा सामना करणाऱ्या ग्राहकांसाठी विभागनिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरे संबंधित ग्राहक सेवा कार्यालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होतील. अ व ई वॉर्डसाठी २८ व २९ सप्टेंबर, ब व एफ/ब वॉर्डसाठी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर, क व एफ/ई वॉर्डसाठी ५ व ६ ऑक्टोबर, ड व जी/द वॉर्डसाठी ७ व ८ ऑक्टोबर, तर जी/उ वॉर्डसाठी ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
तक्रार निवारणासाठी ग्राहकांनी नवीनतम स्मार्ट मीटरचे वीजबिल आणि स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे, असे बेस्टने कळविले आहे.
थकबाकीदार ग्राहकांसाठी ‘अॅम्नेस्टी स्कीम २०२६’
दरम्यान, वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे मीटर काढून घेण्यात आलेल्या ग्राहकांसाठी बेस्टने ‘अॅम्नेस्टी स्कीम २०२६’ जाहीर केली आहे. १ ऑक्टोबर २००६ ते ३० जून २०२३ या कालावधीत थकबाकीमुळे वीजमीटर काढण्यात आलेले सर्व श्रेणीतील ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेत मीटर काढण्यात आलेल्या तारखेपर्यंतची थकीत मूळ रक्कम वसूल केल्यानंतर त्यावरील थकबाकीवरील व्याज (IOA) आणि विलंबित भरणा शुल्क (DP Charges) माफ केले जाणार आहे. ग्राहकांना या योजनेचा लाभ १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत घेता येणार आहे.
योजनेची अधिक माहिती आणि लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाच्या विभागीय अभियंता (ग्राहक सेवा) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.


