सातारा प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये अधिसूचना जारी केली आहे.
परंपरेनुसार सातारा शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, तर उर्वरित मंडळांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
राजपथावरील कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक तसेच कमानी हौद ते शेटे चौक या मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे. त्याचबरोबर शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक, महावितरण कार्यालय, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका, विसर्जन तलाव ते आंदेकर चौक या विसर्जन मार्गावरही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रतापगंज पेठेतील काटदरे मसाले दुकान ते डीसीसी बँक-मोती तळे आणि शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका या मार्गांवरही वाहतुकीवर निर्बंध असतील.
समर्थ मंदिर ते चांदणी चौक तसेच बोगदा-समर्थ मंदिर ते शाहू चौक या मार्गांवर हलकी व अवजड वाहने तसेच एसटी बसेसच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. सज्जनगड आणि कासकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गोडोली नाका, शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. मोळाचा ओढा येथून शहरात येणारी वाहने महानुभाव मठ, करंजे आणि भूविकास बँक चौक मार्गे वळवण्यात येणार आहेत.
विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहनांना पार्किंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तालीम संघ मैदान, कोटेश्वर मैदान किंवा उपलब्ध पर्यायी ठिकाणी वाहने पार्क करावीत, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


