सातारा प्रतिनिधी
सातारा : जावली तालुक्यात अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहीम राबवली आहे. १ ते २१ सप्टेंबरदरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून एकूण ४० गुन्हे दाखल करण्यात आले असून, देशी-विदेशी दारू, बिअर, ताडी तसेच दुचाकी वाहनांसह एकूण २ लाख ३८ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२१ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत बिभवी येथे आकाश विठ्ठल आगलावे, मेढा येथे मयुरेश सुरेश गोरे व गणेश विष्णू धनावडे, सोमर्डी येथे निरंजन साहेबराव परामणे, करहर येथे संभाजी रामचंद्र गोळे, सोनगाव येथे दीपक संजय शेवते आणि आनेवाडी येथे ए. एम. फरांदे यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांकडून देशी तसेच विदेशी दारू जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातील या कारवाईत अवैध मद्यविक्रीशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले. जावली तालुक्यात पुढेही अवैध मद्यविक्री आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, राजेश कोळी, दुय्यम निरीक्षक विजय मरोड, अमित जगताप, निता पाटील, नितीन जाधव, अजित रसाळ, रमेश भुजबळ, जीवन शिर्के, उदयसिंह जाधव, विनोद हिंगणे, अमित क्षीरसागर, बाळासाहेब पाचुंदे आणि किरण जंगम, मुल्ला यांनी कारवाईत सहभाग घेतला.

