ठाणे प्रतिनिधी
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस, प्रवासी आणि रिक्षाचालकांमधील वाद तसेच मनमानी भाड्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी राज्यातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवाशांना गंतव्यस्थानानुसार निश्चित भाडे समजणार असल्याने प्रवास अधिक पारदर्शक आणि सुसूत्र होण्याची अपेक्षा आहे.
स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रीपेड रिक्षा स्टँड आणि नियंत्रण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या गेल्या दीड-दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ही योजना प्रत्यक्षात आली.
या उद्घाटन सोहळ्यास आमदार संजय केळकर, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.
या सेवेमध्ये प्रवाशाची नोंदणी, गंतव्यस्थानानुसार निर्धारित भाडे आणि डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवाशाला किती पैसे द्यायचे आहेत, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे. परिणामी भाड्यावरून होणारी घासाघीस आणि त्यातून निर्माण होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रीपेड व्यवस्थेमुळे रिक्षाचालकांनाही शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करता येणार असून, प्रवाशांना सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसोबतच रिक्षाचालकांच्या उत्पन्नाचे अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्यवस्थापन करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी सांगितले.
‘सिटीफ्लो’च्या माध्यमातून व्यवस्थापन
या संपूर्ण प्रीपेड रिक्षा सेवेचे नियोजन आणि व्यवस्थापन ‘सिटीफ्लो’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी, त्यांचे गंतव्यस्थान, निर्धारित भाडे आणि डिजिटल पेमेंट यांचे व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध करण्यासोबतच प्रवाशांना निश्चित दरात सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत रिक्षा भाड्यावरून होणारे वाद आणि अनिश्चितता कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही प्रीपेड व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. रिक्षात बसण्याआधीच भाडे निश्चित आणि पेमेंटची पद्धत स्पष्ट, अशी या सेवेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

