मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेतील वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांना आता बदलीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने बदली प्रक्रिया ऑनलाइन केल्याने सुमारे ८०० अभियंत्यांच्या बदल्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः १० ते १७ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमुळे महापालिकेच्या ‘मलईदार’ विभागांतील जुनी मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या नियमानुसार एकाच खात्यात किंवा विभागात तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दरवर्षी २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची तरतूद आहे. या बदल्या दरवर्षी १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे नियोजन आहे. मात्र, अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या काही अभियंत्यांकडून ही प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. अभियंता संघटनेनेही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
दरम्यान, नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विरोध होत असेल तर ‘नवीन लोकांनी जायचे कुठे?’ असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑनलाइन बदली प्रक्रियेवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
१ ऑक्टोबरपासून बदली आदेश
बदलीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली होती. २० सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. १८ सप्टेंबरपर्यंत तब्बल ४९४ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी आणि उपलब्ध रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान बदलीचे आदेश जारी करण्यात येणार आहेत.
ऑनलाइन प्रणालीमध्ये अभियंत्यांचा आवश्यक वैयक्तिक सेवाविषयक तपशील तसेच महापालिकेतील रिक्त पदांची माहिती नोंदविण्यात आली आहे. बदलीस पात्र अभियंत्यांना त्यांच्या पसंतीची पाच ठिकाणे प्राधान्यक्रमाने निवडण्याची संधी देण्यात आली आहे.
या प्रक्रियेमुळे बदलीसाठी होणारा कथित वशिला, दबाव आणि हस्तक्षेप कमी होऊन संगणकीय पद्धतीने प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात राहिलेल्या अभियंत्यांची मक्तेदारी संपुष्टात आणून प्रशासनात फेरबदल करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

