मुंबई प्रतिनिधी
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत भाविकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जलद दर्शनाची व्यवस्था करून देण्याचे आमिष दाखवत चार भाविकांकडून एकूण ३,४०० रुपये घेतल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रणव सुरेशकुमार यादव, रा. परळ परिसर, असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी २० वर्षीय विद्यार्थी इक्बाल असामोहम्मद मन्सूरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि त्यांचे तीन मित्र १९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे चरणस्पर्श दर्शन घेण्यासाठी आले होते. गर्दीमुळे लवकर दर्शन मिळावे, यासाठी ते मार्ग शोधत असताना दुपारी सुमारे १.४५ वाजता मॅग्नम टॉवरच्या गेटजवळ त्यांची प्रणव यादव याच्याशी भेट झाली.
यादवने चौघांना जलद चरणस्पर्श दर्शनाची व्यवस्था करून देण्याचे सांगितले. त्यासाठी प्रत्येकी ८५० रुपये, म्हणजे एकूण ३,४०० रुपये मागितल्याचा आरोप आहे. भाविकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ऑनलाइन माध्यमातून ८०० रुपये, तर उर्वरित २,६०० रुपये रोख स्वरूपात दिले.
पैसे घेतल्यानंतर यादव दर्शनाची व्यवस्था करून देतो, असे सांगून तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. जवळपास दोन तास वाट पाहिल्यानंतर भाविकांनी त्याचा शोध घेतला. गर्दीत यादव आढळल्यानंतर त्यांनी दर्शनाच्या पासबाबत विचारणा केली. त्यावेळी आपल्याकडे कोणताही पास नसल्याचे तसेच दर्शनाची व्यवस्था झालेली नसल्याचे त्याने सांगितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. पैसे परत करण्यासही त्याने नकार दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर चारही भाविकांनी यादवला काळाचौकी पोलीस ठाण्यात नेले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. अशा गर्दीच्या ठिकाणी जलद दर्शन, विशेष पास किंवा चरणस्पर्श दर्शनाच्या नावाखाली अनधिकृत व्यक्तींकडून पैशांची मागणी होत असल्यास भाविकांनी अधिकृत व्यवस्था आणि संबंधित मंडळाकडूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

