मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत आता बारावीच्या गुणांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी केवळ ‘एमएचटी-सीईटी’च्या पर्सेंटाईलवर अवलंबून न राहता बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणांना महत्त्व देण्याच्या दृष्टीने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.
या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १७ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला आहे. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धत निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.
सीईटीच्या निकालावरून निर्माण झाले प्रश्न
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान बारावीमध्ये तुलनेने कमी गुण मिळवलेल्या काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाईल मिळाल्याचे प्रकरण समोर आले होते. काही विद्यार्थ्यांनी थेट ९९ पर्सेंटाईलपर्यंत मजल मारल्याने सीईटीच्या परीक्षा पद्धतीबाबत तसेच निकाल प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
या पार्श्वभूमीवर पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून प्रवेश प्रक्रियेचा फेरविचार करण्याची मागणी होत होती. त्यानंतर सरकारने बारावीचे गुण प्रवेश प्रक्रियेत कशा पद्धतीने समाविष्ट करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.
गुणवत्ता यादीसाठी नवे धोरण ठरणार
एमएचटी-सीईटीचा पर्सेंटाईल आणि बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांचा विचार करून अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी कशी तयार करावी, याबाबत समिती शिफारसी करणार आहे. या दोन्ही परीक्षांतील गुणांना किती प्रमाणात महत्त्व द्यायचे, याचे धोरण समिती निश्चित करणार आहे.
समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू तसेच उच्च शिक्षण संचालक हे समितीचे सदस्य असतील. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
समितीला आपला अहवाल १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करायचा आहे. या अहवालानंतर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि एमएचटी-सीईटीचा पर्सेंटाईल यांचा समावेश असलेली प्रवेशपद्धती निश्चित होण्याची शक्यता आहे.

