पुणे प्रतिनिधी
समाजमाध्यमांवरील कथित अवमानकारक वक्तव्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका बाजूला आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागितली, तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा आपला संवैधानिक अधिकार असल्याचे सांगत तो अधिकार यापुढेही बजावत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
“जे काही झाले तो माझ्यासाठी मोठा शॉक होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया पंडित यांनी दिली. त्याचवेळी, “मी जे काही करतोय तो माझा संवैधानिक अधिकार आहे. पहिल्यांदाही मी तो अधिकार बजावत होतो आणि यापुढेही बजावत राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंडित यांच्या अटकेनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते कारागृहाबाहेर आले. सुटकेनंतर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे सांगितले.
“जे काही करत होतो ते सुरू करताना मी कोणाची परवानगी घेतली नाही. तो माझा संवैधानिक अधिकार आहे. तो अधिकार मी आजपर्यंत बजावत आलो आहे आणि यापुढेही बजावत राहणार आहे. मी थांबणार नाही,” असे पंडित म्हणाले.
लोकशाहीमध्ये जनता ही देशाची मालक असल्याचे सांगत त्यांनी सत्तेत असलेल्या लोकांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, अशी भूमिका मांडली. “लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्यांना निवडून देतो, जे लोक सत्तेत आहेत, मग तो कोणताही पक्ष असो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.
आपण कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका केलेली नसल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले. आपल्या भूमिकेचा उद्देश केवळ जनतेच्या हिताशी संबंधित प्रश्न मांडणे हा असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. पण कोणाला चुकीचे वाटले असेल तर मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश जनतेचे भले व्हावे एवढाच आहे,” असे पंडित यांनी सांगितले.
“मी समाजकार्य करत नाही, तर माझा संवैधानिक अधिकार बजावत आहे. तो अधिकार मी बजावतच राहणार. थांबणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
पंडित यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार त्यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटींचा समावेश आहे. त्यामुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर पंडित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी संबंधित प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.

