पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत गरजेनुसार प्रमुख रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
गणेशोत्सव काळात लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यांसह मध्यवर्ती भागातील विविध मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी किंवा वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तसेच काही रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे नियम परिस्थितीनुसार तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांची गर्दी वाढल्यास वाहतूक पोलिसांकडून संबंधित मार्गावरील वाहतूक वळविण्याचा अथवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते सेवासदन चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे जावे किंवा हमजेखान चौकातून महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडी पेठ पोलिस चौकीमार्गे शंकरशेठ रस्त्याचा वापर करावा. तसेच सेवासदन चौक ते टिळक चौकदरम्यान सायंकाळी पाचनंतर गर्दी संपेपर्यंत वाहतूक बंद केली जाईल. बाजीराव रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने जावे.
शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक आणि पुढे रामेश्वर चौक ते जेधे चौक या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जे. एम. रस्ता, अलका चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच सिमला चौक, कामगार पुतळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. दुसऱ्या बाजूने कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल, देवजीबाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता आणि शंकरशेठ रस्त्याने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
बाजीराव रस्ता : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौकदरम्यान सायंकाळी पाचनंतर वाहतुकीत बदल राहणार आहे. वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, टिळक चौक आणि केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकाकडे जावे. टेलिफोन भवन ते पूरम चौकदरम्यानचा एकेरी वाहतुकीचा नियम तात्पुरता शिथिल करून गरजेनुसार दुहेरी वाहतूक केली जाणार आहे.
अन्य प्रमुख बदल : सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण आणि हिराबाग चौक परिसरातील वाहतूक मन्साराम नाईक रस्ता, डॉ. कोटनीस हॉस्पिटल, शिवाजी रस्ता, भिकारदास चौक, खजिना विहीर चौक मार्गे टिळक रस्त्याकडे वळविण्यात येईल. दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक आणि हिराबाग चौक परिसरातही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
सणस रस्त्यावरील गोटीराम भैया चौक ते गोविंद हलवाई चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार असून गोटीराम भैया चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, कस्तुरे चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. पानघंटी चौक ते गंज पेठ चौकीदरम्यान जैन मंदिर चौक, फुलवाला चौक आणि कस्तुरे चौक हा पर्यायी मार्ग राहणार आहे.
गावकसाब मशीद ते सेंट्रल स्ट्रीट चौकीदरम्यानच्या वाहतुकीसाठी बाबाजान चौक, सरबतवाला चौक मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कोहिनूर चौक ते बाबाजान चौक या मार्गावरील वाहतूक भगवान महावीर चौक, सरबतवाला चौक मार्गे वळविण्यात येईल. जेधे प्रसाद रस्ता, सुभान शहा रस्ता, पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक तसेच सुभान शहा दर्गा ते सोन्या मारुती चौक परिसरातही वाहतूक बदल लागू राहणार आहेत.
या मार्गांवर ‘नो पार्किंग’
गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरत्या स्वरूपात ‘नो पार्किंग’ व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी रस्ता-जिजामाता चौक ते मंडई चौक आणि मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्ता-शनिपार ते फुटका बुरुज आणि अप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रस्ता-एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक आणि शास्त्री रस्ता-सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक या मार्गांचा समावेश आहे.
एकेरी वाहतुकीचे नियमही गरजेनुसार शिथिल
१८ ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी पाचनंतर गरजेनुसार कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा चौक आणि कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे नियम तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत. गर्दीचा ओघ लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी, देखावे पाहण्यासाठी येणारे नागरिक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बंद असलेल्या मार्गांवर वाहने नेणे टाळावे, रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग करू नये आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

