मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दोन अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याला कारवाई आणि बदनामीची धमकी देत तब्बल २.२५ कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालाडमधील बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
मालाड पश्चिम येथील ‘विन्ट्री टेक प्रायव्हेट लिमिटेड’चे मालक अमूल्य वासा यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २० जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास जयपूर ईडी कार्यालयातील सहाय्यक संचालक मोहित गर्ग (३६) आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता (३५) हे मालाडमधील माइंडस्पेस येथील त्यांच्या कार्यालयात आले होते.
या दोघांनी वासा यांच्या व्यवसायात बेकायदेशीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कारवाईची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वासा यांनी कायदेशीर नोटीस तसेच संबंधित कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यांना कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे दाखवण्यात आले नसल्याचा आरोप आहे.
दरम्यान, वासा यांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची तसेच जवळच्या सहकाऱ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याचवेळी दोन महागडे मोबाइल फोन आणि सिमकार्ड तयार ठेवण्यास सांगण्यात आले. एका कर्मचाऱ्याच्या नावावर नोंदणीकृत फोन आणि सिमकार्ड स्वतःकडे घेतल्याचेही वासा यांनी पोलिसांना सांगितले.
सुरुवातीला पाच कोटींची मागणी
तक्रारीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पाच कोटी रुपयांची मागणी केली. अखेर २.२५ कोटी रुपयांवर व्यवहार ठरल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास कठोर कारवाई तसेच अटक होऊ शकते, अशी भीती दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्याच दिवशी रात्री वासा आणि त्यांचे व्यावसायिक सहकारी मालाडमधील एका रेस्टॉरंटमध्ये आरोपींसोबत गेले. तेथे पैशांबाबत चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वासा यांनी एक कोटी रुपये दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे सांगण्यात आले.
‘फाइल बंद झाली’ सांगून उर्वरित रक्कम घेतल्याचा आरोप
एक कोटी रुपये मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण बंद करण्यास मंजुरी दिल्याचा दावा आरोपी अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, वासा यांनी त्याचा कागदोपत्री पुरावा मागितला. त्यावेळी फाइलची प्रत्यक्ष पडताळणी केवळ दिल्लीमध्येच होऊ शकते, असे त्यांना सांगण्यात आले.
यानंतर वासा यांचे दोन सहकारी २५ जुलै रोजी दिल्लीला गेले. तेथे एका मॉलमध्ये आरोपी अधिकाऱ्यांची भेट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांना एक कथित दस्तऐवज दाखवण्यात आला. त्यावरून प्रकरण निकाली निघाल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर उर्वरित १.२५ कोटी रुपये देण्यात आले.
पैसे दिल्यानंतरही पुन्हा हप्त्याची मागणी
२.२५ कोटी रुपये घेतल्यानंतरही आरोपींनी अतिरिक्त पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून दर महिन्याला ठरावीक रक्कम देण्याची मागणी करण्यात आल्याचेही एफआयआरमध्ये नमूद असल्याचे सांगण्यात आले.
नंतर कागदपत्रांची पडताळणी आणि ओळखीच्या व्यक्तींकडून चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा संशय वासा यांना आला. त्यानंतर त्यांनी बांगूर नगर पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
दरम्यान, आरोपी दोन्ही अधिकारी राजस्थानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, या संपूर्ण व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच कथित कागदपत्रांची सत्यता काय आहे, याचाही तपास केला जात आहे.

