मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या लोकल प्रवासात अपघात झाल्यास जखमी प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई उपनगरी मार्गावरील ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची तयारी मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त तसेच अचानक प्रकृती बिघडलेल्या प्रवाशांना स्थानकावरच प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपनगरी रेल्वे स्थानकांवर दररोज मोठी गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडणे, धावत्या गाडीत चढताना किंवा उतरताना दुखापत होणे, फलाटावर अपघात होणे किंवा प्रवाशाची अचानक प्रकृती खालावणे अशा घटना घडतात. अशा प्रसंगी रुग्णालयात नेण्यापूर्वी मिळणारे प्राथमिक उपचार महत्त्वाचे ठरतात. याच पार्श्वभूमीवर ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याची योजना करण्यात आली आहे.
चेंबूर आणि मानखुर्द येथील वैद्यकीय कक्षांसाठी औषध परवान्याशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथील सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. तर खोपोली स्थानकावरील वैद्यकीय कक्षासाठी पावसाळ्यानंतर बांधकामाचे काम रेल्वेकडून केले जात आहे. आवश्यक प्रक्रिया आणि कामे पूर्ण झाल्यानंतर खोपोलीतही प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे.
दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघाती मृत्यू व जखमींची संख्या पाहता स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. २०२५ मध्ये मध्य रेल्वेवर १,४५७, तर पश्चिम रेल्वेवर ८३० अपघाती मृत्यू झाले. दोन्ही रेल्वे मार्गांवरील एकूण मृत्यूंची संख्या २,२८७ होती. २०२४ मध्ये हा आकडा २,४६८, २०२३ मध्ये २,५९० आणि २०२२ मध्ये २,५०७ होता.
जखमींच्या आकडेवारीतही मोठी संख्या दिसून येते. २०२५ मध्ये मध्य रेल्वेवर १,५६५ आणि पश्चिम रेल्वेवर ९८९ प्रवासी जखमी झाले. दोन्ही मार्गांवरील एकूण जखमींची संख्या २,५५४ होती. २०२४ मध्ये २,६९७, २०२३ मध्ये २,४४१ आणि २०२२ मध्ये २,१५५ प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे.
रेल्वे स्थानकांवरील वैद्यकीय कक्षांमुळे अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना प्राथमिक उपचार तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. मात्र या सुविधेत प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे, प्राथमिक उपचाराची साधने आणि गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईच्या लोकलवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४३ स्थानकांवरील हे वैद्यकीय कक्ष महत्त्वाची सुविधा ठरणार आहेत.

