मुंबई प्रतिनिधी
मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध भागांतून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलने सुरू केली असून, आता आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दिपके यांनी लक्ष वळविले आहे.
अभिजीत दिपके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चर्चेसाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न बाळगता आश्रमशाळांमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्याचा दावा करण्यात आला. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याबरोबरच विद्यार्थिनींच्या गर्भधारणा चाचण्या करण्यात आल्याचे गंभीर आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आरोपांमुळे आदिवासी आश्रमशाळांमधील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनाच आरोपी केले जात असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी चर्चेदरम्यान केला. सरकारी आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रारही करण्यात आली. विशेषतः भंडारा जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला. या शाळेत एका खोलीत तब्बल १५ विद्यार्थ्यांना ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून तेथील परिस्थितीही जाणून घेतली होती. आता आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आश्रमशाळांचा प्रश्न आगामी काळात ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या राजकीय प्रवेश करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा देणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. पेपरफुटीच्या प्रश्नापासून सुरू झालेली त्यांची विद्यार्थी चळवळ आता सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि आदिवासी आश्रमशाळांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नावर दिपके पुढील काळात कोणती भूमिका घेतात, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

