पुणे प्रतिनिधी
‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत मामीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यातील नवले पुलाजवळ धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना चार जणांनी आपली गाडी अडवून वाहनाला जबरदस्तीने धडक दिली. त्यानंतर पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आपला हात ओढून जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला आहे.
महिला का सुरक्षित नाहीत ?
अभिनेत्रीला लुटण्याचा प्रयत्न..
भाजपाच्या राज्यात महिला असुरक्षित pic.twitter.com/pW3sYHtdtA— NCP SP SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL (@social_mediaNcp) September 14, 2026
या घटनेनंतर कल्याणी नंदकिशोर यांनी समाजमाध्यमावर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. या व्हिडीओमध्ये त्यांनी हाताला झालेल्या दुखापती दाखवत घटनेची माहिती दिली. तसेच या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, त्या मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना नवले पुलाजवळ त्यांच्या वाहनाला संबंधितांनी धडक दिली. त्यानंतर वाहन थांबवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. आपण पैसे देण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि संबंधितांनी हात ओढून आपल्याला त्यांच्या वाहनात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कल्याणी नंदकिशोर यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. ‘आजही महिला सुरक्षित नाहीत का?’ असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण कलाकार असल्याने समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या प्रकाराविरोधात आवाज उठवू शकतो; मात्र सर्वसामान्य महिलांचे काय, असा सवालही त्यांनी केला.
या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला आयोगाने हस्तक्षेप करावा आणि संबंधितांविरोधात तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी कल्याणी नंदकिशोर यांनी केली आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या आरोपांनंतर नऱ्हे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, घटनेमागील नेमके कारण तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका तपासल्यानंतरच संपूर्ण प्रकार स्पष्ट होणार आहे.

