मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात तब्बल पाच हजार नव्या ‘लालपरी’ बसेस दाखल होणार असून, या बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीच्या बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
पाच हजार नव्या बसेसच्या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्स या नामांकित कंपनीने सादर केला आहे. त्यामुळे नव्या बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. जुन्या बसेसवरील ताण कमी होण्यासोबतच बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होणार असून, प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे.
एसटीच्या ताफ्यातील जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या बसेसमुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे. पुढील सहा महिन्यांत सुमारे पाच हजारांहून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे नव्या बसेसचा ताफ्यात समावेश एसटीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २ हजार ६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांनुसार आधुनिक होणार आहे.
पाच हजार नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मात्र, मागणी केलेली बसफेरी तोट्यात जाणार नाही, याची हमी संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पाच हजार ‘लालपरी’ बसेसचा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटीचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा देतानाच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार आहे. एसटीच्या ताफ्यात होणारी ही मोठी वाढ म्हणजे केवळ बसेसची संख्या वाढविणे नसून, प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाला नवी दिशा देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
Author : सातारा प्रतिनिधी वेब टीम

