मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, ८३ तालुक्यांमध्ये पाण्याचा थेंबही पडलेला नाही. गेल्या ६० दिवसांहून अधिक काळ पाऊस नसल्याने शेतातील पिके जळून गेली आहेत. एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला असताना दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात मोठी खदखद निर्माण झाली आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील या विदारक परिस्थितीकडे सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप राऊत यांनी केला. “एकीकडे मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. पिके जळून गेली आहेत. ६० दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याचा थेंब पडलेला नाही. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. लोकांच्या मनामध्ये खदखद आहे,” असे राऊत म्हणाले.
“एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना एक सरकार ब्रिक्समध्ये मॉकटेल पित आहे, दुसरे सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खात आहे आणि तिसऱ्या सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे, याची माहिती नाही. मग जनतेने दाद कुणाकडे मागायची?” असा खरमरीत सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान आणि राज्यातील आंदोलनांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही राऊत यांनी केली.

