पिंपरी प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा ओलांडली, वाहतुकीचे नियम मोडले किंवा एखादा गंभीर प्रकार घडला तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाहनाचा नोंदणी क्रमांक येऊ नये, यासाठी चक्क नंबर प्लेटच गायब करणारी ‘मोटराइज्ड’ यंत्रणा मोटारीवर बसविल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. ‘पुश बटण’ दाबताच नंबर प्लेटवर काळे आवरण येऊन संपूर्ण क्रमांक झाकला जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी ताथवडे परिसरातील मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित मोटारचालकाने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या पाटीवर यांत्रिक पद्धतीने आवरण येईल अशी व्यवस्था बसविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा वाहन चालू असताना चालकाला एका बटणाच्या साहाय्याने नियंत्रित करता येत होती.
महामार्गांवरील वेग मोजणारे कॅमेरे, स्वयंचलित वाहतूक अंमलबजावणी व्यवस्था आणि ई-चलान प्रणालीमुळे वाहनाचा नोंदणी क्रमांक हा वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरतो. मात्र, संबंधित मोटारीवर बसविलेल्या यंत्रणेमुळे वाहनाचा क्रमांकच कॅमेऱ्यांच्या नजरेपासून लपविता येत असल्याने या प्रकाराने वाहतूक सुरक्षेच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, अपघात, गंभीर स्वरूपाचा गुन्हा किंवा अन्य बेकायदा कृत्य घडल्यानंतर संबंधित वाहनाचा माग काढता येऊ नये, तसेच नाकाबंदी, दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाहनाचा नोंदणी क्रमांक जाणीवपूर्वक लपवून शासनाच्या वाहतूक नियंत्रण यंत्रणेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओने प्रकार उघड
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून धावणाऱ्या या मोटारीचा नोंदणी क्रमांक लपविण्याची यंत्रणा दाखविणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत वाहनाच्या नंबर प्लेटवर काळे आवरण खाली येताना आणि संपूर्ण नोंदणी क्रमांक झाकला जात असल्याचे दिसत होते. हा प्रकार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर वाहनाचा शोध सुरू करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित मोटारीचा माग काढला. त्यानंतर वाहनमालकाच्या कायमस्वरूपी पत्त्यावर जाऊन मोटारीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नंबर प्लेट लपविण्यासाठी मोटारीवर विशेष ‘मोटराइज्ड’ यंत्रणा बसविण्यात आल्याचे आढळले. या यंत्रणेमुळे चालकाच्या नियंत्रणाखाली नंबर प्लेट क्षणार्धात झाकता येत असल्याचे स्पष्ट झाले.
‘पुश बटण’ दाबताच नंबर प्लेट झाकली
या यंत्रणेची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की, चालकाने ‘पुश बटण’ दाबताच नंबर प्लेटवर काळे आवरण खाली येत होते. त्यामुळे बाहेरून पाहताना वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसत नव्हता. बटणाद्वारे आवरण पुन्हा वर घेऊन नंबर प्लेट पूर्ववतही करता येत होती. त्यामुळे टोलनाक्यावर किंवा नियमित तपासणीच्या वेळी नंबर प्लेट दिसत असताना महामार्गावरील कॅमेऱ्यांच्या टप्प्यात वाहन येताच ती लपविण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत पथकर नाक्यावर मोटारीचा नंबर स्पष्टपणे दिसत असल्याचे आढळले. मात्र, महामार्गावर वाहन धावताना नंबर लपविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यामुळे ही व्यवस्था केवळ सजावटीसाठी नसून नंबर प्लेट जाणीवपूर्वक लपविण्यासाठीच वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले.
आरटीओची कारवाई; साडेचार हजारांचा दंड
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आरटीओच्या भरारी पथकाने संबंधित वाहनावर कारवाई केली. मोटारीवर बसविण्यात आलेली नंबर प्लेट झाकणारी यंत्रणा काढून टाकण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित चालकाकडून चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
“पथकर नाक्यावर मोटारीचा नंबर स्पष्ट दिसत होता. मात्र, महामार्गावरून जाताना क्रमांक लपविण्यासाठी वाहनावर यंत्रणा बसविण्यात आली होती. या वाहनाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली असून, वाहनावर बसविण्यात आलेली यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे. चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे,” अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली.
नंबर प्लेट लपविण्याचा प्रयत्न गंभीर का?
वाहनाचा नोंदणी क्रमांक हा केवळ वाहनाची ओळख नसून वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. महामार्गावरील वेगमर्यादा, सिग्नल उल्लंघन, धोकादायक वाहनचालक, अपघातानंतर पसार होणे किंवा अन्य गुन्हेगारी प्रकारांमध्ये सीसीटीव्ही आणि स्वयंचलित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनाचा क्रमांक टिपला जातो. त्यावरून वाहनमालकापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होते.
मात्र, एका बटणाद्वारे नंबर प्लेटच झाकता येत असेल तर या संपूर्ण यंत्रणेची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारची उपकरणे वाहनांवर बसविणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून, भविष्यात गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही अडथळा निर्माण करू शकणारा प्रकार ठरू शकतो.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. संबंधित यंत्रणा नेमकी कोठून बसविण्यात आली, ती कोणी तयार केली किंवा बसविली, तसेच वाहनाचा नंबर लपविण्यामागे अन्य काही कारण किंवा वापर झाला आहे का, याबाबतही तपास केला जात आहे.

