लंडन:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नागरिककेंद्री प्रशासन, लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये बुधवारी एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेच्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची आणि राज्यातील लोककल्याणकारी योजनांची चर्चा थेट ब्रिटिश संसदेच्या व्यासपीठावर झाली.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासोबतच महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे विस्तार केल्याबद्दल शिंदे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि युवकांसाठीच्या कौशल्यविकासाच्या उपक्रमांची विशेष दखल घेण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठी मातीचा अभिमान व्यक्त करणाऱ्या शब्दांनी केली. ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ब्रिटनच्या संसदेच्या ऐतिहासिक सभागृहात मराठीचा आणि महाराष्ट्राचा आवाज घुमल्याने उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले गेले.
आपल्या भाषणातून शिंदे यांनी महाराष्ट्राची केवळ राजकीय किंवा आर्थिक ओळख मांडली नाही, तर मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचाही जागतिक व्यासपीठावर गौरव केला. ‘लाभले आम्हास भाग्य, जाणतो मराठी’ या सुरेश भट यांच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी मातृभाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आपल्या जीवनातील आई आणि पत्नीच्या संघर्षातून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भावनिक उल्लेखाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल किंवा इमारती उभारणे नव्हे; तर विकासाचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे,’ अशी भूमिका मांडत शिंदे यांनी नागरिककेंद्री प्रशासनाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा नागरिकांच्या दारात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांसाठी कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
या सन्मानाच्या निमित्ताने शिंदे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक क्षमतेचेही दर्शन घडविले. मुंबई आणि लंडन ही दोन्ही जागतिक आर्थिक केंद्रे असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान आर्थिक आणि औद्योगिक सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्यविकास यांसारख्या क्षेत्रांत ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नेण्याचे उद्दिष्टही त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेचा उल्लेख करत शिंदे यांनी भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. या विकासप्रवासात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असून, राज्यात गुंतवणूक, उद्योग, रोजगार आणि नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ब्रिटनमधील उद्योगजगताने महाराष्ट्रातील उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटिश संसद सदस्य, मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध सन्मान होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. हाऊस ऑफ लॉर्ड्समधील ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’नंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित कार्यक्रमात ‘स्टेट्समॅनशिप अवॉर्ड’, तर लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या सन्मानानेही त्यांचा गौरव होणार आहे.
हाऊस ऑफ लॉर्ड्समधील हा सन्मान स्वीकारताना शिंदे यांनी हा पुरस्कार केवळ आपला व्यक्तिगत गौरव नसून महाराष्ट्राच्या जनतेच्या कार्याचा आणि राज्याच्या विकासाचा गौरव असल्याचे सांगितले. ‘हा सन्मान महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा सन्मान आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ब्रिटिश संसदेच्या ऐतिहासिक वास्तूत ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि मराठी भाषेचा झालेला गौरव हा या कार्यक्रमाचा विशेष ठरला. एका बाजूला महाराष्ट्राच्या कल्याणकारी योजनांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणी झाली, तर दुसऱ्या बाजूला मराठी भाषा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळखही जागतिक समुदायासमोर अधोरेखित झाली. त्यामुळे शिंदे यांचा हा लंडन दौरा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या विकासाची, गुंतवणुकीची आणि सांस्कृतिक अस्मितेची आंतरराष्ट्रीय मांडणी करणारा दौरा ठरला.

