मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे चित्र आहे. पक्षातून खासदारांच्या झालेल्या फुटीनंतर काही काळ बॅकफूटवर गेलेल्या पक्षाला पुन्हा संघटित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षाची ताकद पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला. आता राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी नव्या चेहऱ्यांकडे सोपवून पक्षाने पुढील निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वरुण सरदेसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. कल्याणसह भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही सरदेसाई यांच्याकडे असेल. सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अरुण दुधवडकर यांच्याकडे कोल्हापूर, संजय सावंत यांच्याकडे बारामती, बबनराव थोरात यांच्याकडे हिंगोली आणि अशोक धात्रक यांच्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गुलाबराव वाघ यांच्याकडे रावेर, सुनील शिंदे यांच्याकडे अहिल्यानगर आणि शिर्डी, मुकेश साळुंके यांच्याकडे नंदुरबार, प्रदीप बोरकर यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संजय मानाजी कदम यांच्याकडे रायगड आणि प्रसाद भोईर यांच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विभास पोतनीस यांच्याकडे पालघर, सचिन पडवळ यांच्याकडे पुणे, किरण तावडे यांच्याकडे शिरूर, उदय दळवी यांच्याकडे सातारा, स्वप्नील पुंजिर यांच्याकडे सांगली आणि महेंद्र इंदूलकर यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी आशीष चेंबूरकर, जालन्याची सुनील वामन पाटील, धाराशिवची सुनील काटमोरे, नांदेडची किशोर पोतदार, परभणीची प्रदीपकुमार खोपडे, लातूरची परमेश्वर सातपुते, बीडची अशोक सकपाळ, बुलढाण्याची नरेंद्र खेडेकर आणि अकोल्याची नीलेश धुमाळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. किशोर ठाणेकर, यवतमाळ-वाशीमसाठी दिलीप जाधव, वर्ध्यासाठी सुधीर सूर्यवंशी, नागपूरसाठी सतीश हरडे, रामटेकसाठी सुरेश सावंत, गडचिरोली-चिमूरसाठी महेश केदारी, चंद्रपूरसाठी प्रशांत कदम आणि भंडारा-गोंदियासाठी राजू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय आदित्य शिरोडकर यांच्याकडे ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरुनाथ खोत यांच्याकडे मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्र आणि ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संपर्क उपनेत्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यांची, तर नितीन देशमुख यांच्याकडे बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये संपर्कप्रमुखांची नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेला आतापासूनच निवडणुकीसाठी सक्रिय करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी आणि संघटनबांधणीची प्रक्रिया लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

