मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नवरात्रोत्सवाला अद्याप जवळपास महिनाभराचा अवधी असला तरी गरबा-दांडियामधील मुस्लिमांच्या सहभागावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. गरब्यात ‘लव्ह जिहाद’ होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोध दर्शविला आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
‘आपला उत्सव सर्वांना सामावून घेतो. एखादा मुस्लिम व्यक्ती गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल, तर त्यात गैर काय आहे?’ असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘मी अमृता फडणवीस वहिनींसोबत आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे.’
यावेळी संजय राऊत यांनी भाजपमधील हिंदुत्वाच्या भूमिकेवरही टीका केली. ‘फडणवीसांच्या लाडक्या बोगस हिंदुत्ववाद्यांचे काऊन्सिलिंग करा,’ असा सल्ला त्यांनी अमृता फडणवीस यांना दिला. तसेच, ‘जे यजमान आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे टोळभैरव आहेत, नवहिंदुत्ववादी आहेत, त्यांना सांगायला हवे की हा महाराष्ट्र आणि हा देश घडविण्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे फार मोठे योगदान आहे,’ असे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यानंतर आता गरबा-दांडियाच्या आयोजनावरूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच मुस्लिमांच्या गरबा प्रवेशाचा मुद्दा चर्चेत आल्याने आगामी काळात यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

