मुंबई प्रतिनिधी
ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा होत असतानाच या उत्सवाला ‘नशामुक्त महाराष्ट्रा’च्या संकल्पनेची जोड देण्यात आली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर आणि घाटकोपर येथील विविध दहीहंडी उत्सवांना भेट देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दहीहंडीतून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनर प्रदर्शित करण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करणे गरजेचे आहे. हा संदेश केवळ एका मोहिमेपुरता मर्यादित न राहता प्रत्येक कुटुंबापर्यंत आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. दहीहंडीसारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवातून व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविता येईल.
संघभावना, साहस आणि शिस्तीचा उत्सव
घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात बोलताना मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीचे महत्त्व अधोरेखित केले. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राची परंपरा, तरुणाईचे साहस आणि संघभावनेचा जागर आहे, असे त्यांनी सांगितले.
मानवी मनोरा उभारताना तळातील गोविंदापासून सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते. परस्परांवरील विश्वास, समन्वय, शिस्त आणि धैर्याच्या जोरावरच हे आव्हान पेलले जाते. त्यामुळे दहीहंडी हा संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
घाटकोपरची दहीहंडी मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून देशाच्या विविध भागांतून गोविंदा पथके येथे सहभागी होतात. त्यामुळे या उत्सवाला व्यापक सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
वरळी येथील जांबोरी मैदानावर परिवर्तन फौंडेशनच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवातही मुख्यमंत्री उपस्थित राहिले. दहीहंडीच्या माध्यमातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. मात्र, उंच मानवी मनोरे रचताना गोविंदा पथकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, प्रवीण दरेकर, राम कदम, अमित साटम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, आयोजक, गोविंदा पथके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

