परभणी प्रतिनिधी
परभणी : राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. पिके करपण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर रविवारी शेतकरी व युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेतकरी आणि युवकांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि खासदार संजय जाधव उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘या मेळाव्यात जमलेली गर्दी कुणीही आणलेली किंवा भाड्याने जमवलेली नाही. आपल्या सरकारवर विश्वास ठेवून लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकरी स्वतःहून मोठ्या संख्येने येथे आले आहेत. महायुती सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे आईचे नाव लिहिण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.’’
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सहा हजार रुपयांप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्जमाफी योजनेचा १२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी आणि युवकांच्या हिताच्या योजना पुढेही प्राधान्याने राबविल्या जातील. शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार आवश्यक ते सर्व निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

