ठाणे प्रतिनिधी
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेच्या स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या ५९ वर्षीय गणपत गवळी याच्यावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारच्या प्रकरणात निलंबित होण्याची ही त्याची दुसरी वेळ असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनी दुपारचे जेवण झाल्यानंतर ताटे धुण्यासाठी स्वयंपाकगृहाकडे जात असताना गवळी याने त्यांच्या अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेच्या संचालिका गौरी सारक्ते यांच्याकडे तक्रार केली. मात्र, विद्यार्थिनींनी तक्रार करूनही संचालिकांनी त्याची वेळीच दखल घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
त्यानंतर विद्यार्थिनींनी एका शिक्षकाकडे हा प्रकार सांगितला. संबंधित शिक्षकाने तातडीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या चौकशीत विद्यार्थिनींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ती दडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका संचालिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या भूमिकेबाबतही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
आश्रमशाळेच्या परिसरात सुरक्षेसाठी दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, घटना घडली त्यावेळी हे कॅमेरे सुरू होते की बंद, तसेच उपलब्ध फुटेज तपासण्यात आले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आश्रमशाळेत सुमारे ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, त्यामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापिका यांचा समावेश आहे. आश्रमशाळेत संगणक कक्ष, डिजिटल वर्ग यांसह आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याची माहितीही समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

