मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाचवी ते दहावीच्या तब्बल २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला. या करारानुसार पुढील ३६ महिन्यांत राज्यभरात डोळे तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागामार्फत केली जाणार असून, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट हा प्रकल्प अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करणार आहे. तर वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदाराची भूमिका बजावणार आहे. तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित संस्थेकडून पार पाडली जाणार आहे.
त्रैमासिक अहवालातून प्रकल्पावर लक्ष
प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. तपासणी शिबिरांची संख्या, तपासण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, दृष्टीदोष आढळलेले विद्यार्थी आणि वितरित करण्यात आलेल्या चष्म्यांची संख्या यासह विविध बाबींचा त्रैमासिक प्रगती अहवालाद्वारे आढावा घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती वैज्ञानिक पद्धतीने संकलित केली जाणार असून, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. डेटा संरक्षण आणि गोपनीयतेच्या तरतुदी करारामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ६.८० लाख विद्यार्थ्यांची तपासणी
या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यापूर्वी २०१९ पासून राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ८०० शाळांमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून, दृष्टीदोष असलेल्या ६३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना चष्मे पुरविण्यात आले आहेत.
नव्या प्रकल्पामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष, डोळ्यांच्या तक्रारी आणि संबंधित समस्या वेळेत निदर्शनास येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीसोबतच त्यांच्या एकूण आरोग्यावरही या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या करारप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशनचे संचालक वेणू अंबाती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

