मुंबई प्रतिनिधी
मुंबई, २६ : पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होत असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) पुढाकार घेणार आहे. स्थानिक औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चाकणमधील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. तसेच चाकण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या व दुरवस्थेतील पायाभूत सुविधा, वीज तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणी यामुळे उद्योजकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक औद्योगिक संघटनांशी समन्वय साधून या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र चेंबर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, “चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, पायाभूत सुविधांअभावी उद्योगांच्या विस्तारावर परिणाम होत आहे. स्थानिक असोसिएशनशी चर्चा करून महत्त्वाचे प्रश्न एकत्रित केले असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार आणि उद्योजक यांच्यात भक्कम दुवा म्हणून काम करत चाकणमधील समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने प्रयत्न करेल.”
महाराष्ट्र चेंबरने चाकणमधील उद्योजकांच्या समस्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर MACCIA तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी व संचालक यांची तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.
प्रश्नांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर आणि चाकणमधील उद्योजकांच्या वतीने अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. या बैठकीला चाकण एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, धनराज शेडबाळे, शंतनू कुलकर्णी, रामेश्वर पवार आणि कुणाल आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर चाकणमधील उद्योजकांमध्ये समस्यांवर लवकर तोडगा निघण्याबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.

