ठाणे प्रतिनिधी
ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने व्यापक वाहतूक नियोजन केले आहे. बुधवारी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध मार्गांवर प्रवेशबंदी, वाहतूक वळविणे तसेच वाहनतळासंदर्भात निर्बंध लागू राहणार आहेत.
मिरवणुकीच्या मार्गांवर वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो मिरवणुकीच्या मार्गावर जाणे टाळावे आणि पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना अंबाडी नाक्यावर अडथळा
वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गाचा वापर करून पुढे जाता येईल.
तसेच वाडा येथून नदीनाका मार्गे भिवंडी शहरात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड आणि वसई रोडमार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगावमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील.
वडपे तपासणी नाक्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग बदल
वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या मार्गावरील वाहने धामणकरनाका जलवाहिनी येथे उजवे वळण घेऊन जलवाहिनी मार्गाने वाडा किंवा पुढील ठिकाणी जाऊ शकतील. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरविण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाणे आणि कल्याणकडून जुना आग्रा रोडमार्गे वाडा, चाविंद्रा आणि मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंपाच्या पुढे प्रवेशबंदी असेल. या वाहनांनी पेट्रोल पंपाजवळून उजवे वळण घेऊन नागावमार्गे पुढे जावे.
रांजनोळी नाक्यावर एसटी, केडीएमटी आणि इतर वाहनांना प्रवेशबंदी
रांजनोळी चौकातून भिवंडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस, केडीएमटी बस, जड-अवजड वाहने, रिक्षा तसेच मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजनोळी नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
जड-अवजड, मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजनोळी नाक्यावरून वळसा घालून मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका, अंजूरफाटा, वसई रोड किंवा ओवळी खिंडमार्गे ओवळी गाव, ताडाळी जकात नाका आणि जलवाहिनी मार्गाने पुढे जाता येईल.
एसटी, केडीएमटी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोळी नाका येथे उतरावे लागणार आहे.
राबोडीतही वाहतूक बदल
ठाणे शहरातील राबोडी परिसरातील के. व्हिला नाका मार्गे आकाशगंगा आणि राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना के. व्हिला येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या वाहनांनी के. व्हिला नाक्यावरून सरळ मीनाताई ठाकरे चौक रोडने जुने राबोडी पोलीस ठाणे मार्गे इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पत्रीपुलावरून वाहतूक वळविणार
कल्याणमधील पत्रीपुल परिसरातही वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एपीएमसी बाजार आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेशबंदी असेल.
या वाहनांनी पत्रीपुल येथून डावीकडे वळून गोविंदवाडी बायपासमार्गे पुढे इच्छितस्थळी जावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
विठ्ठलवाडीत मिरवणुकीनुसार वाहतूक तात्पुरती बंद
विठ्ठलवाडी परिसरातील नेहरूनगर, उल्हासनगर जुना बस स्टॉप, मेन रोड, हिललाइन पोलीस ठाण्यासमोरील रस्ता, नेताजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कॅम्प रोड, समतानगर रोड आणि कैलास कॉलनी या मिरवणुकीच्या मार्गावर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.
मिरवणूक पुढील चौकात मार्गस्थ झाल्यानंतर संबंधित मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. मिरवणुकीच्या मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी असेल. वाहनचालकांना मुख्य रस्ता सोडून परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गांवर वाहने उभी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंब्र्यात अवजड वाहनांसह बसलाही प्रवेशबंदी
मुंब्रा परिसरातही मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करण्यात आले आहे. रेतीबंदरमार्गे मुंब्रा शहरात जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना रेतीबंदर तसेच वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या वाहनांनी रेतीबंदर-मुंब्रा बाह्यवळण मार्गाचा वापर करून पुढे इच्छितस्थळी जावे.
तसेच रेतीबंदरमार्गे मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी बसगाड्यांनाही रेतीबंदर व वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी राहणार आहे. या बसमधील प्रवाशांना रेतीबंदर परिसरात उतरावे लागेल किंवा बसला मुंब्रा बाह्यवळण मार्गाने पुढे जाता येईल.
वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पर्यायी मार्गांवरील वाहतुकीवरही होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी बुधवारी दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, मिरवणुकीच्या मार्गावर वाहने नेणे टाळावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणूक जसजशी पुढे सरकेल, तसतसे काही मार्गांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

