सोलापूर प्रतिनिधी
पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले तरी सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचे चित्र अद्याप बदललेले नाही. जिल्ह्यातील काही भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने टंचाईग्रस्त गावांना पावसाळ्यातही टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. २३ ऑगस्टच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी सात तालुक्यांतील ४६ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांतील ६९ हजार ७६५ नागरिक आणि ४५ हजार ९४७ पशुधन पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत.
टँकरच्या मंजूर खेपांपैकी ५३ खेपा झाल्या असून, त्याचे प्रमाण ९७.१४ टक्के आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या पाण्याची मागणी आणि त्यावरील अवलंबित्व अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते.
माढा, माळशिरसमध्ये पशुधनाची चिंता
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका काही तालुक्यांमध्ये पशुधनाला बसत आहे. माढा तालुक्यात आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, २० हजार २४२ नागरिक आणि १७ हजार ८१७ पशुधन बाधित आहे. मंजूर १३.५ खेपांपैकी १२.५ खेपा पूर्ण झाल्या असून, त्याची टक्केवारी ९१.६७ आहे.
माळशिरस तालुक्यात चार गावांसाठी चार टँकर सुरू आहेत. येथे ७ हजार ६५२ नागरिकांसह २७ हजार ४२९ पशुधन पाणीटंचाईच्या संकटात आहे. विशेषतः पशुधनाची संख्या मोठी असल्याने या भागात पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता आहे.
करमाळ्यात सहा टँकर
करमाळा तालुक्यात आठ गावांसाठी सहा टँकर सुरू असून, १४ हजार ६४८ नागरिक आणि ५३ पशुधन बाधित असल्याची नोंद आहे. अक्कलकोट तालुक्यात चार गावांसाठी एक टँकर सुरू असून, ८७३ नागरिकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
बार्शी तालुक्यात १२ गावांसाठी एक टँकर सुरू असून, ५६१ नागरिक आणि ३४३ पशुधन बाधित आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात तीन गावांसाठी पाच टँकर सुरू असून, १२ हजार ३६७ नागरिक टंचाईने बाधित आहेत. वडाळा आणि बीबी दारफळ येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात एका गावासाठी एक टँकर सुरू असून, २ हजार ३०८ नागरिक बाधित आहेत. सांगोला तालुक्यात सहा गावांसाठी सहा टँकर सुरू असून, ११ हजार ११४ नागरिक आणि ६४ पशुधन पाणीटंचाईला सामोरे जात आहेत.
मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूरमध्ये टँकर बंद
जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ आणि पंढरपूर या तीन तालुक्यांत सध्या टँकर सुरू नसल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट होते. मात्र, पुढील काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास या भागातील पाणीस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
विहिरी, बोअर अधिग्रहित
पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १८ विहिरी आणि १० बोअर अधिग्रहित केले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील अकोलेकाट गावात ९ जुलैपासून टँकर सुरू आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील टँकर ५ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे.
उजनी भरले, तरी जिल्ह्याची तहान कायम
सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण १०० टक्के भरल्याची बाब दिलासादायक आहे. मात्र, धरणातील पाणी संपूर्ण जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास पुरेसे ठरत नसल्याने अनेक भागांतील टंचाई कायम आहे. भीमा नदी, उजनी कालवा आणि सीना नदी परिसरात तुलनेने समाधानकारक स्थिती असली तरी जिल्ह्याच्या अन्य भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
सप्टेंबरच्या पावसाकडे लक्ष
आता जिल्ह्याचे लक्ष सप्टेंबरमधील पावसाकडे लागले आहे. सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सध्या सुरू असलेले टँकर पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत सुरू ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर आगामी उन्हाळ्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाऊस लांबल्यास उन्हाळ्यात टँकरची संख्या ३००च्या आसपास पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उजनी धरण पूर्ण भरलेले असतानाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कायम राहणे ही प्रशासनासमोरील मोठी चिंता ठरणार आहे.
पावसाळ्यातच ३२ टँकर सुरू असणे हे जिल्ह्यातील जलस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारे आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस झाला नाही, तर टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांसह पशुधन आणि शेतीवर होण्याची भीती आहे.

