मुंबई प्रतिनिधी
रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सोमवारी कांदिवलीत काही अमराठी रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. कांदिवली पश्चिमेकडील लिंक रोडवर रिक्षा रस्त्यात उभ्या करून ‘रस्ता रोको’ करण्यात आल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राज्यात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीला काही अमराठी रिक्षाचालकांकडून विरोध होत आहे. नियमाचे पालन न केल्यास कारवाई होण्याची भीती चालकांमध्ये निर्माण झाली असून, त्यातूनच काही भागांत आंदोलन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कांदिवली, मालवणीसह मुंबईतील काही भागांत रिक्षा व टॅक्सीचालकांचे सुरू झालेले आंदोलन कोणत्याही मान्यताप्राप्त युनियनने पुकारलेले नसल्याचे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी स्पष्ट केले. काही चालकांकडून इतर चालकांना रिक्षा किंवा टॅक्सी चालविण्यापासून रोखले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘चालकांमध्ये कारवाईची भीती’
मराठी भाषेच्या नियमामुळे चालकांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत मंगळवारी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन देण्यात येणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.
काही ठिकाणी चालकांमध्ये गैरसमज निर्माण करून आंदोलन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील बहुतांश भागांत रिक्षा सेवा सुरळीत सुरू असून, चालकांनी घाबरून न जाता आपली सेवा सुरू ठेवावी आणि प्रवाशांना सहकार्य करावे, असे आवाहन युनियनकडून करण्यात आले आहे.
‘अधिकृत संप पुकारलेला नाही’
मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनीही रिक्षा व टॅक्सीचालकांचा कोणताही अधिकृत संप किंवा आंदोलन पुकारण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. युनियनने आंदोलनाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रवाशांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कांदिवलीतील आंदोलनादरम्यान प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही रिक्षाचालकांना आंदोलनकर्त्यांकडून धमकावण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काही रिक्षा रस्त्यावर उभ्या करून वाहतूक अडविण्यात आल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.
आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय
लिंक रोड हा पश्चिम उपनगरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने रिक्षाचालकांनी रस्ता अडवल्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
मराठी भाषेच्या नियमाच्या अंमलबजावणीवरून रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आता रस्त्यावर उतरल्याने सरकारसमोरही नवे आव्हान निर्माण झाले आहे. एका बाजूला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचा सरकारचा आग्रह, तर दुसरीकडे चालकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करू नये, अशी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे सरकार आणि रिक्षा संघटनांमध्ये होणाऱ्या चर्चेतून या प्रश्नावर तोडगा निघतो का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

