मुंबई प्रतिनिधी
मुंबई : विलेपार्ले परिसरातील पार्लेश्वर जिम्नॅस्टिक व्यायामशाळेतील ४८ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन मुलीला व्यायामशाळेत एकटीला बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश देवरुखकर असे संबंधित शिक्षकाचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीला व्यायामशाळेत एकटीला बोलावले होते. यावेळी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने घरी दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला सोबत घेऊन विलेपार्ले पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गणेश देवरुखकर याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे गणेश देवरुखकर याला २०२३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकाविरुद्ध अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा गुन्हा दाखल झाल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.

