मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविल्याच्या कथित प्रकारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. कुकरच्या १३ शिट्ट्या देऊनही न शिजणारा कच्चा वाटाणा विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना खाऊ घालावा, असे म्हणत राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. निकृष्ट धान्याचा प्रकार उघड करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली; मात्र संबंधित पुरवठादारावर काय कारवाई झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, आंबेगावमधील एका शाळेत पोषण आहारासाठी पुरविण्यात आलेला वाटाणा कुकरच्या १३ शिट्ट्या देऊनही शिजत नव्हता. हा प्रकार लोकांसमोर आणणाऱ्या शिक्षिका रेश्मा पाध्ये यांना निलंबित करण्यात आले. या निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर मात्र कारवाई का होत नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाटाणा आपल्या घरी नेऊन शिजवून दाखवावा. विद्यार्थ्यांनी हा कच्चा वाटाणा घेऊन ‘वर्षा’ निवासस्थानी जावे आणि मुख्यमंत्र्यांना खाऊ घालावा. ज्या विद्यार्थ्यांनी हे अन्न खाऊन त्रास सहन केला, त्यांची सरकारने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
राऊत यांनी पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीवरही गंभीर आरोप केले. संबंधित पुरवठादाराचे नाव पगारिया असून तो मुख्यमंत्री फडणवीस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये भाजपला आर्थिक मदत करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करत या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.
‘भाजप हाच पेड इव्हेंट’
पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी जोरदार टीका केली. तरुण आणि विद्यार्थ्यांचा असा अपमान करणे चुकीचे असून नागपुरात मुख्यमंत्री जनरेशन झेडच्या तरुणांसोबत जो कार्यक्रम घेणार आहेत, तो पेड इव्हेंट आहे का, असा सवाल त्यांनी केला. भाजपकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरही टीका करत भारतीय जनता पक्ष हाच एक ‘पेड इव्हेंट’ आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा १,५०० रुपये देणे आणि बिहारमध्ये आर्थिक मदतीची घोषणा करणे याचाही त्यांनी उल्लेख केला. तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करत नीट परीक्षेतील पेपरफुटी, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न यावर सरकार पुरेसे बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचाही उल्लेख
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला जनरेशन झेडच्या प्रश्नांची जाणीव झाली, असा दावा राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयात या तरुणांचे फोटो लावावेत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
सरकारने जनरेशन झेडच्या प्रश्नांना ‘पेड इव्हेंट’ म्हणून हिणवू नये. त्यांच्या आंदोलनांमुळेच सरकारमधील नेत्यांना आता तरुणांची आठवण झाली आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मैदानांच्या प्रश्नावर तरुणांसोबत आंदोलन सुरू केल्यानंतर भाजपलाही अशा कार्यक्रमांची आठवण झाली, असा आरोप राऊत यांनी केला.
MIDC भूखंडांवरही आरोप
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडांबाबतही राऊत यांनी गंभीर आरोप केले. मराठी उद्योजकांना MIDC मध्ये भूखंड मिळत नसल्याच्या ११ तक्रारी आपल्याकडे आल्या असून उद्योजकांना थेट एजंटांकडे पाठविले जाते, असा दावा त्यांनी केला. MIDC चे भूखंड कुणाला मिळतात, त्यासाठी किती पैशांचा व्यवहार होतो, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
धर्म, उद्योग, शिक्षण आणि मुलांचा पोषण आहार यासारख्या सर्वच क्षेत्रांत आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांनी सरकारवर टीका केली.
मैदाने आणि जमिनींच्या प्रश्नावरूनही हल्लाबोल
मुंबईतील मैदाने वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे राऊत यांनी समर्थन केले. ही मैदाने सरकारच्या मर्जीत असलेल्या विशिष्ट बिल्डरांच्या हाती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईची विक्री सुरू असून सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांकडून शहरातील भूखंड आणि मैदाने खासगी हितसंबंधांसाठी वापरली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनींच्या प्रश्नावरही राऊत यांनी आवाज उठविला. चाकण परिसरातील जमिनी विमानतळ प्रकल्प आणि इतर औद्योगिक प्रकल्पांसाठी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अदानी समूहाने जमिनी ताब्यात घेतल्याचा दावा करत २७ गावांतील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखरेच्या दरवाढीवरून सरकारला प्रश्न
साखरेच्या वाढत्या दरावर भाष्य करताना राऊत म्हणाले, साखर उत्पादनासाठी लागणारा ऊस मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीकडे वळत आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारभावावर परिणाम होत असून सरकारने याबाबत योग्य धोरण आखण्याची गरज आहे. जनरेशन झेडचे मेळावे घेणाऱ्या भाजप नेत्यांनी तरुणांच्या घरात जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधावा, रोजगार, शिक्षण आणि वाढत्या महागाईच्या प्रश्नांवर त्यांची मते जाणून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

