पुणे प्रतिनिधी
पुणे : बीडमधील राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम गंगाधर करांडे (२८) याने पुण्यातील गुलटेकडी परिसरात मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुकाराम काही दिवसांपासून मित्रांसोबत गुलटेकडी परिसरात राहत होता. १५ दिवसांपूर्वी त्याच्यावर देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी बीड पोलिसांनी कारवाई केली होती. या घटनेनंतर तो नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तुकाराम हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील मूळ रहिवासी असून, सध्या बीड शहरातील स्वराज्यनगर येथे राहत होता. त्याने राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मंगळवारी रात्री तुकारामचे मित्र कामानिमित्त बाहेर गेले असताना त्याने खोलीत गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सुमारे १५ दिवसांपूर्वी बीड शहरातील हॉटेल यशोदा परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तुकाराम करांडे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कारवाईनंतर तुकाराम मानसिक तणावात आणि नैराश्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो पुण्यात आला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली, याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मार्केटयार्ड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

