पुणे प्रतिनिधी
पुणे : दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणेमळा येथे घरातील वीजेचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का बसून दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. ओम भोईटे आणि रोहित भोईटे अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सोनवणेमळा परिसरात शोककळा पसरली आहे.
अनिल भोईटे यांच्या घरी सकाळच्या सुमारास घरगुती वीजेचे काम सुरू होते. त्यावेळी ओम भोईटे याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. ओमला वीजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्याचा चुलत भाऊ रोहित त्याच्या मदतीसाठी धावला. मात्र, ओमला वाचविण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विजेचा तीव्र धक्का बसला.
दोन्ही तरुणांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, सुदैवाने त्या या दुर्घटनेतून बचावल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी ओम आणि रोहित यांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेने राहू परिसरात हळहळ व्यक्त होत असून भोईटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या काळात घरातील तसेच शेतातील विद्युत उपकरणे आणि वीजवाहिन्यांपासून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

