स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : घाटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात ३५ वर्षीय महिलेचा पूर्वनियोजित कटातून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सपना प्रमोद गंजी असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी तिची सासू, मोलकरीण, तिचा पती, मुलगा आणि मुलगी अशा पाच जणांना अटक केली आहे. जुन्या कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
१६ ऑगस्ट रोजी रात्री सपना घरातील बाथरूममध्ये पडल्याचे सांगून त्यांना प्रथम सुप्रीम हॉस्पिटल आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.४१ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाची पाहणी करताना त्यांच्या गळ्याभोवती काळे-निळे व्रण आणि डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्त्राव आढळल्याने डॉक्टरांना संशय आला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
सुरुवातीला सासू धनलक्ष्मी गंजी हिने भांडणादरम्यान सपना बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, तपासात हा अपघाती मृत्यू नसून नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिलेचे वडील राजेंद्र नरसया वल्लाळ यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या चौकशीत धनलक्ष्मी हिने जुन्या कौटुंबिक वादातून सपना हिच्याविषयी असलेल्या रागातून खुनाचा कट रचल्याचे समोर आले. सपना यांनी २०२४ मध्ये सासरच्या मंडळींविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही तक्रार केली होती. याच कारणातून धनलक्ष्मीने पूर्वीच्या मोलकरणीशी संपर्क साधून तिच्या कुटुंबाच्या मदतीने सपना हिचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सपना जून २०२६ मध्ये मुलासह दुबईहून मुंबईत आली होती. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी खुनाचा कट आखण्यात आला. मोलकरीण मंगलाबाई जाधव आणि तिच्या कुटुंबाला या कामासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता सपना घरात एकटी असताना आरोपी एकामागोमाग घरात शिरले. सपना नशेत असताना त्यांच्या डोक्यात काचेचा ग्लास मारण्यात आला. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून ओढणीच्या सहाय्याने गळा आवळण्यात आला. त्यानंतरही त्यांचा मृत्यू न झाल्याने आरोपींनी गळ्यावर पाय ठेवून त्यांचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी धनलक्ष्मी भिक्षापती गंजी (६०), मंगलाबाई सुरेश जाधव (४५), शिवानी सुरेश जाधव (२१), सुरेश गणपत जाधव (४६) आणि साजन सुरेश जाधव (१९) यांना अटक करण्यात आली आहे. धनलक्ष्मीला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य चार आरोपींना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून त्यांनाही २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पंतनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्यासह पंतनगर पोलीस ठाण्यातील पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

