ग्वाल्हेर :
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७९ वर मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या लोडिंग वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तब्बल आठ मजुरांचा मृत्यू झाला, तर २५ ते २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक इतकी भीषण होती की मजुरांनी भरलेले वाहन महामार्गावरच उलटले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
हा भीषण अपघात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनामध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
पेरणीचे काम आटोपून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व मजूर मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. डबरा परिसरातील चनूर भागात ते भात रोपणीच्या कामासाठी आले होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री उशिरा हे मजूर लोडिंग वाहनातून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतत होते. चिन्का परिसरात राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर मजुरांचे वाहन महामार्गावर उलटले. वाहनात मोठ्या संख्येने मजूर असल्याने अनेक जण त्याखाली आणि वाहनाच्या लोखंडी सांगाड्यात अडकले. अपघातानंतर महामार्गावर मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच पाच जणांचा मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी राम महेश यादव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने गोहद रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. उपचार सुरू असताना आणखी तीन जणांनी अखेरचा श्वास घेतला.
या दुर्घटनेत सुमारे २५ ते २६ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
भरधाव ट्रक पोलिसांच्या ताब्यात
पोलीस अधिकारी राम महेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि मजुरांचे वाहन यांच्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण धडक झाली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाचा शोध सुरू आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, रात्रीच्या वेळी मजुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेले जात होते का, तसेच ट्रकचा वेग किती होता, यासह अपघाताच्या विविध शक्यता तपासल्या जात आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेशातील मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

