वसई प्रतिनिधी
नालासोपारा पूर्वेकडील नीलकंठेश्वर इमारतीत वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर ११ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची गंभीर दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी विजयलक्ष्मी रुग्णालयाला भेट देत उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली.
महापौर पाटील यांनी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून प्रकृतीची माहिती घेतली. बाधित रुग्णांना महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर काही जणांना अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. केकचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. तसेच केक कुठून खरेदी करण्यात आला, त्याची गुणवत्ता काय होती आणि बाधितांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याचाही तपास केला जाणार असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

