रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी : लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेने शाळांमधील ऑनलाइन अभ्यास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पद्धतीने अभ्यास देऊन मोबाईलच्या अतिवापराला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोरोना काळापासून शाळांमध्ये ऑनलाइन अभ्यासाची पद्धत सुरू झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलचे प्रमाण वाढले. काही शाळांमध्ये गुगलवर माहिती शोधून अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाते. त्यामुळे पाठ्यपुस्तकांचा वापर कमी होऊन विद्यार्थी थेट गुगलवर उत्तरे शोधत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मोबाईलच्या अतिवापराबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शिक्षकांना पुन्हा पारंपरिक अभ्यासपद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.
पाढे पाठांतरावर भर
ऑनलाइन अभ्यास बंद करून जुन्या पद्धतीने शिक्षण देताना विद्यार्थ्यांकडून दोन ते ३० पर्यंतचे पाढे पाठ करून घेतले जाणार आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये पाढे पाठांतराची पद्धत रूढ होती. मात्र, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ही पद्धत मागे पडली. आता पुन्हा पाढे पाठांतरावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण अधिकारी आणि पदाधिकारी शाळांना भेटी देऊन पाढे पाठांतराची पाहणी करणार आहेत.

