मुंबई प्रतिनिधी
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पुनर्वसनासह मुलुंड आणि कुर्ला येथील जागांच्या वापरावरून सुरू असलेल्या विरोधाला आता व्यापक आंदोलनाचे स्वरूप येण्याची चिन्हे आहेत. धारावीकर, मुलुंडवासी आणि कुर्लावासीयांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला धारावी, मुलुंड पूर्व आणि कुर्ला दूध डेअरी परिसरात तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी तिन्ही ठिकाणच्या रहिवाशांचे संयुक्त मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र झोपडपट्टीवासीयांना ३५० चौरस फुटांचे घर देण्याची तरतूद आहे. मात्र, ३५० ऐवजी ५०० चौरस फुटांचे घर द्यावे, अशी धारावी बचाव आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. तसेच अपात्र ठरविण्यात येणाऱ्या रहिवाशांसह सर्व धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करावे, कोणालाही धारावीबाहेर स्थलांतरित करू नये आणि जबरदस्तीने घरे रिकामी करू नयेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, धारावी पुनर्वसनासाठी मुलुंड पूर्वेतील मिठागराची ४२.५१ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याशिवाय मुलुंड कचराभूमीची सुमारे १५ एकर जागा पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या शक्यतेला मुलुंडवासीयांचा विरोध आहे. या मुद्द्यावर आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाईही सुरू आहे.
कुर्ला येथील दूध डेअरीची जागा धारावी पुनर्वसनासाठी वापरण्यासही स्थानिकांचा विरोध आहे. मात्र, सरकारकडून रहिवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे धारावी, मुलुंड आणि कुर्ला या तिन्ही भागांतील रहिवासी आता एकत्र येत आंदोलनाची दिशा ठरवत आहेत.
आदित्य ठाकरेंसोबत बैठक
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुलुंड, कुर्ला आणि धारावीतील रहिवाशांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुलुंडमधील रहिवासी ॲड. सागर देवरे यांनी दिली.
त्यानुसार १५ ऑगस्टला तिन्ही ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. धारावीतील रॅली दुपारी ३ वाजता मुकुंदनगर येथील संविधान चौकातून सुरू होऊन शिवनारायण बावडी येथे समाप्त होईल. त्यानंतर तेथे सभा घेण्यात येणार आहे. या रॅलीत धारावीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक तथा माजी आमदार बाबूराव माने यांनी केले आहे.
५०० चौ. फुटांच्या घरासाठी लढा
धारावीकरांना ५०० चौरस फुटांचे घर मिळावे, शाहूनगरवासीयांचे शाहूनगरमध्येच ७५० चौरस फुटांच्या घरात पुनर्वसन करावे, कोणत्याही रहिवाशाची जबरदस्तीने घरे रिकामी करू नयेत आणि धारावीकरांचे धारावीबाहेर पुनर्वसन करू नये, या मागण्यांसाठी पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. १५ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीनंतर दहा दिवसांनी धारावी, मुलुंड आणि कुर्ला येथील रहिवासी एकत्रितपणे मोठे आंदोलन करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

