गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेत रात्री झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, प्रकल्प अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जपतलाई येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी रात्री खोलीत झोपल्या असताना सर्पदंशाची घटना घडली. रात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थिनींना सापाने दंश केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींना तातडीने धानोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दीपिका लकडा आणि सुष्मिता मंडल यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर अनु कोरेटी हिला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. दीपिका लकडा ही इयत्ता सहावी, तर सुष्मिता मंडल ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. अनु कोरेटीच्या वर्गाची माहिती उपलब्ध झालेली नाही.
या घटनेत अन्य तीन विद्यार्थिनींनाही सर्पदंश झाल्याची माहिती आहे. दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपिका मदवी इयत्ता पाचवीत, कविता किरंगा इयत्ता सहावीत, तर समृद्धी नैताम इयत्ता आठवीत शिकत आहे. समृद्धी नैताम हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात
आश्रमशाळेत घडलेल्या या गंभीर घटनेची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहे. पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, सर्पदंशाची घटना नेमकी कशी घडली, विद्यार्थिनींना उपचारासाठी किती वेळात रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले का, याबाबत चौकशी केली जात आहे.
या आश्रमशाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. घटनेमुळे विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्था, विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था आणि सर्पदंशानंतर करण्यात आलेल्या उपचारांबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

