अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी गेलेल्या कंत्राटी महापालिका कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज कचरूसिंग रजपूत-परदेशी यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
मनपा विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीच्या कामासाठी ई-स्मार्ट संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेत धीरज रजपूत हेल्पर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पथदिवे दुरुस्तीच्या कामासाठी अक्षय कैलास मुळे, काव्य गणेश तावरे आणि धीरज रजपूत हे तिघे मुकुंदनगरमधील दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात गेले होते. मुळे आणि तावरे इमारतीवर कामासाठी गेले असताना धीरज खाली थांबले होते. त्याचवेळी काही जण तेथे आले आणि त्यांनी धीरज यांच्यावर लोखंडी दांडक्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
धीरज यांना वाचविण्यासाठी मुळे आणि तावरे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत धीरज यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन दिवस उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
नियोजनबद्ध हल्ल्याचा संशय
या प्रकरणात मनपा विद्युत विभागातील वायरमन युनूस शेख याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. तपासात युनूस शेख यानेच अक्षय मुळे यांना फोन करून मुकुंदनगर येथे दुरुस्तीचे काम असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अचानक झालेला वाद नसून हल्ला नियोजनपूर्वक करण्यात आला होता का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
अक्षय मुळे यांच्या फिर्यादीवरून मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्ताकिम अस्लम सय्यद यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांची संख्या सहा ते सात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणातील तीन आरोपी आणि आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा तसेच हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
‘टिळा लावला म्हणून मारहाण’; पत्नीच्या आरोपाने खळबळ
धीरज परदेशी यांच्या पत्नीने ‘माझ्या नवऱ्याने टिळा लावला होता म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली,’ असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोर केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पालकमंत्री विखे-पाटील यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांनी संयम राखावा : पोलिसांचे आवाहन
धीरज परदेशी यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. काही भागांत दुकानेही बंद करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गडबड करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी केले. जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या तसेच शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
‘संरक्षण देता येत नसेल तर नागरिकांना बंदुका द्या’
महापालिका कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांच्या हत्येची निष्पक्ष व सखोल चौकशी करून उर्वरित फरार आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही अटक करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी पोलीस महासंचालकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ‘अहिल्यानगरकरांना संरक्षण देता येत नसेल तर सरकारने नगरकरांना स्वसंरक्षणासाठी बंदुका द्याव्यात,’ असा संतापही काळे यांनी व्यक्त केला.
रुग्णालयाबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा ठिय्या
धीरज परदेशी यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमले. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रुग्णालय परिसरासह शहरातील संवेदनशील भागांत मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

