प्रयागराज :
शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात असताना तरुणांसाठी रोजगाराच्या संधी मात्र कमी होत आहेत. देशातील प्रत्येक हजार तरुणांपैकी केवळ १२ जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळते, असा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. रोजगार, बेरोजगारी, पेपरफुटी आणि सरकारी भरती प्रक्रियेतील दिरंगाईवरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
प्रयागराज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्कूल्स इको’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांसह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा, सोशल मीडिया आणि तरुणांच्या भवितव्यावरही भाष्य केले.
“प्रत्येकजण एआयबद्दल बोलत आहे; मात्र तुमच्या डेटाशिवाय एआयला अर्थ नाही. डेटामधून एआय तयार करता येतो; मात्र एआयमधून डेटा तयार करता येत नाही. डेटा तुमचा आहे आणि तरुणांची क्षमता तुमची आहे. मात्र व्यवस्था तरुणांना एका दुष्टचक्रात अडकवत आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
‘डेटा तुमचा, वेदना तुमची आणि संपत्ती त्यांची’
तरुणांच्या डेटाच्या वापराबाबतही राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. “तुमचा डेटा हिसकावून मोठ्या कंपन्यांना दिला जात आहे. डेटा तुमचा आहे, वेदना तुमची आहे आणि संपत्ती मात्र त्यांची आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरावर भाष्य करताना त्यांनी तरुणांना उद्देशून सावध केले. “तुम्हाला हव्या तितक्या रील्स पाहा आणि हव्या तितक्या रील्स बनवा, असे सांगितले जाते. हे २१व्या शतकातील व्यसन आहे. तरुण त्यात अडकून मजूर बनत आहेत,” असे ते म्हणाले.
‘भारताची ताकद तरुणाई आणि डेटा’
भारताकडे मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळ आणि डेटा ही दोन मोठी शक्तिस्थाने आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. “देशात सुमारे ४० कोटी उत्साही तरुण आहेत. हीच भारताची ताकद आहे. २१व्या शतकात भारताची प्रगती तरुणांची क्षमता आणि त्यांनी निर्माण केलेल्या डेटावर अवलंबून असेल,” असे त्यांनी सांगितले.
“लोक चीन, अमेरिका आणि रशियाबद्दल बोलतात. मात्र २१व्या शतकात भारताची तरुण पिढी आणि तिची क्षमता ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे,” असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.
‘तरुणांनी द्वेष नव्हे, प्रेमाने आवाज उठवावा’
देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी तरुणांना द्वेषापासून दूर राहण्याचे आवाहन केले. “भारताची संस्कृती सत्य आणि अहिंसेची आहे; द्वेषाची नाही. एकाही विद्यार्थ्याने आपल्या मनात द्वेष बाळगू नये. द्वेष करण्याऐवजी व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करा,” असे त्यांनी म्हटले.
विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रसारमाध्यमांमधील कथित प्रचारयंत्रणेचाही त्यांनी उल्लेख केला. विविध संस्थांमध्ये विचारप्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेवरून सरकारला घेरले
काँग्रेसकडून बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि सरकारी भरती प्रक्रियेतील विलंब हे मुद्दे सातत्याने उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रयागराजमधील या विद्यार्थी संवादाकडे पाहिले जात आहे.
“विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. आपण प्रेमाने लढा दिला पाहिजे,” असे सांगत राहुल गांधी यांनी तरुणांनी आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. “आपण द्वेष आणि हिंसेच्या माध्यमातून कधीही काम करणार नाही. प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून व्यवस्था बदलली पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

